Happy Independence Day 2024 : सध्या देशभरात स्वातंत्र्यदिनाची तयारी जोरात सुरू आहे. दरवेळेप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी भारत आपला 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करेल. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवणार असून देशाला संबोधित करणार आहेत. यावर्षी स्वातंत्र्य दिनाची थीम ‘विकसित भारत 2047’ ठेवण्यात आली आहे. हा स्वातंत्र्यदिन संस्मरणीय करण्यासाठी देशभरातून विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
लाल किल्ल्यावर 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे 6000 विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी, विविध क्षेत्रात राष्ट्र उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 24 विविध श्रेणीतील लोकांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
शेतकरी, आशा आणि एएनएम यांना निमंत्रण
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ घेतलेल्या एकूण 250 शेतकऱ्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हे लोक अशा लाखो शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात ज्यांना सरकारने दिलेल्या मदतीचा मोठा फायदा झाला आहे. याशिवाय प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे 250 लाभार्थी शेतकरी स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शेतकरी उत्पादक संघटनांच्या एकूण 500 सदस्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण आणि दुर्गम भागात मूलभूत आरोग्य सेवा देणाऱ्या 150 आशा आणि एएनएम कामगार या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचा भाग असतील.
लखपती, ड्रोन दीदीही या सोहळ्याचा भाग असणार
याशिवाय ग्रामपंचायतींमधून निवडून आलेल्या 300 महिला प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे. 150 लखपती दीदी आणि 150 ड्रोन दीदींनाही पाचारण करण्यात आले आहे. एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूलचे 150 विद्यार्थी, 100 आदिवासी कलाकार आणि वन धन विकास केंद्र, अंगणवाडी, सखी केंद्राचे सदस्य स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. महिला सक्षमीकरणासाठी संकल्प हब आणि बालकल्याण समितीच्या 300 महिला कर्मचारीही स्वातंत्र्याच्या विशेष सोहळ्याला पोहोचणार आहेत.
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारे खेळाडू विशेष अतिथी
400 NSS स्वयंसेवक आणि मेरी माटी मेरा देश अंतर्गत मेरा भारत योजनेचे 200 लाभार्थी 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात सहभागी होतील. पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सुमारे 150 खेळाडूंना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. याशिवाय आकांक्षी जिल्हा कार्यक्रमाच्या प्रत्येक ब्लॉकचे प्रतिनिधीत्व करणारे एक हजार सदस्य, एआयएमचे 200 इनोव्हेटर्स आणि विद्यार्थी आणि पंतप्रधान श्री योजनेचे 200 विद्यार्थ्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.