Dharashiv News : आगामी विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. याच पार्श्वभुमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ‘जनसन्मान यात्रे’चा शुभारंभ केला आहे. तर शरद पवार गटाकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चा शुभारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा बुधवारी धाराशिवपर्यंत पोहोचली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून सुप्रिया सुळे या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. धाराशिवमध्ये पोहचताच सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर यात्रेची सभा पार पडली. या सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केले आहे. ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
यावेळी त्या म्हणाल्या, “भावाने मागितलं असतं तर पक्ष आणि चिन्ह सगळं देऊन टाकलं असतं, गेल्या काही दिवसापासून सरकारचं कौतुक वाटायला लागले आहे. सगळे सरकार चांगले काम करत असतात. पण लोकसभेच्या इलेक्शननंतर बहीण लाडकी वाटायला लागली, अशी खोचक टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
महाराष्ट्रातील महिला स्वाभिमानी आहेत. तुम्ही 1500 रुपये दिले म्हणून आम्ही नात्यात वाहत जाऊ. सत्तेतील आमदारांना वाटायला लागले आहे की, 1500 रुपये दिले की कोणताही अन्याय आमच्यावर करू शकता”, अशी देखील टीका सुप्रिया सुळे यांनी केली.
तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणीला ओवाळणी देणार असे म्हटले होते. अहो देवेंद्रजी तुम्ही स्वतःच्या खिशातून पैसे देताय का?,” असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे, आपला पक्ष फुटलेला नसून तो हिसकावून घेण्यात आला आहे. असा आरोपही त्यांनी केला.