Abhishek Manu Singhvi : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी पुन्हा एकदा राज्यसभेच्या रिंगणात उतरले आहे. काँग्रेसने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अभिषेक मनू सिंघवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
तेलंगणामध्ये राज्यसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या जागेसाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सिंघवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसची सत्ता असून सिंघवी यांचा विजय जवळ-जवळ निश्चित मानला जात आहे.
या वर्षी एप्रिलमध्ये काँग्रेसने सिंघवी यांना हिमाचल प्रदेशमधून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या काही आमदारांच्या बंडखोरीमुळे त्यांचा पराभव झाला. यावेळी भाजपचे हर्ष महाजन राज्यसभेवर निवडून आले.
हिमाचलच्या राज्यसभा निवडणुकीत काय घडलं?
मार्च महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत सिंघवी यांचा पराभव झाला होता. यावेळी काँग्रेसकडे 40 आमदार होते. पण त्यापैकी सहा आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले. त्यामुळे सिंघवी यांना 34 तर भाजपचे उमेदवार हर्ष महाजन यांनाही 34 मते मिळाली. त्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली आणि महाजन यांचे नाव निघाले. त्यामुळे त्यांना विजयी घोषित केले होते.