आज देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर पोहोचले असून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीएम मोदींच स्वागत केले आहे. आज लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित करण्याची पीएम मोदी यांची 11 वी वेळ आहे.
याआधी पीएम मोदी राजघाटवर पोहोचले होते. त्यांनी इथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. सकाळी 7.26 वाजता नरेंद्र मोदी तिन्ही सेनादलाच्या प्रमुखांना भेटणार आहेत. . त्यानंतर सकाळी 7.30 वाजता नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतील. त्यानंतर 7.33 वाजता मोदी लाल किल्ल्यावरून संपूर्ण देशाला संबोधित करतील. 8.30 वाजता राष्ट्रगीत होईल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे लाल किल्ल्याच्या परिसरात आगमन झाले आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेदेखील ध्वजारोहण परिसरात आले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेदेखील लाल किल्ल्याच्या परिसरात दाखल झाले आहेत.
देशासाठी आज खूप मोठा दिवस आहे. आजच्याच दिवशी 78 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. ब्रिटिशांनी भारतीय नागरिकांवर खूप जुलूम आणि अत्याचार केले होते. त्या अत्याचारांच्या विरोधात भारताच्या शूर स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला होता. त्यामुळे आपण आज देशात मोकळा श्वास घेऊ शकत आहोत. आजचा दिवस देशासाठी प्राणाची आहुती दिलेल्या अशा लाखो स्वातंत्र्य सैनिकांना वंदन करण्याचा दिवस आहे.
आज लाल किल्ल्यावरून मोदी आपल्या भाषणात देशासाठी काही मोठी घोषणा करतात का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.