भारतीय स्वातंत्र्याच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या असून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना, क्रांतीकारकांना, हौतात्म्य पत्करलेल्या शहिद वीरांना, अभिवादन केले आहे. असंख्य ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य, देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी वचनबद्ध होऊया, सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य-जबाबदारीच्या भावनेतून राष्ट्रविकासात योगदान देऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी केले आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी सर्वात मोठा राष्ट्रीय उत्सव आहे. हा उत्सव तितक्याच उत्साहात, आनंदात, व्यापक स्वरुपात साजरा करायचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या ‘हर घर तिरंगा..’ अभियानाने याची सुरुवात झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी आपण दृढसंकल्प करुया की, राष्ट्रविकासात सर्वांना सोबत घेऊन जाताना शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक यांना प्रगतीची योग्य संधी उपलब्ध करून द्यायची आहे. त्यांचे आर्थिक-सामाजिक सक्षमीकरण करायचे आहे. देशाला आत्मनिर्भर बनवताना महिलांना, वंचितांना, उपेक्षितांना, अल्पसंख्याकांना समाजात मान, सन्मान, आदर, प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वर्षाला तीन गॅस सिलिंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, पिंक ई-रिक्षा योजना, शेतकऱ्यांच्या शेतीपंपाला मोफत वीज देणारी बळीराजा वीजसवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, युवकांना विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, ज्येष्ठ नागरिकांच्या धार्मिक पर्यटनासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजना संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सक्रीय सहभाग द्यावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
देशाचे स्वातंत्र्य, एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही मूल्ये अबाधित राखणे, भारतीय राज्यघटनेवरचा विश्वास अधिक दृढ करणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आजवर सर्वोच्च त्याग केला, अमूल्य योगदान दिले. त्या सर्वांबद्दल आपण कायम कृतज्ञ असले पाहिजे. देशाचे स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करुया, असेही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या संदेशात केले आहे.