आज देशभर स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा होत आहे.स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र मंदिरे आणि १२ ज्योतिर्लिंग मंदिरात देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त आकर्षक सजावट करण्यात आली आहे. असेच प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या मंदिरापैकी एक असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज करोडो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढपूरच्या विठुरायाचे मंदिर देखील तिरंग्यानं सजले आहे. तसेच आज मंदिर समितीने विठ्ठल मंदिरास तीन रंगांच्या (तिरंगा) फुलांची आकर्षक आरास केली असून विठुरायाही या स्वातंत्र्याच्या रंगात रंगून गेला आहे.
संत नामदेव पायरी, उत्तर द्वार तसेच पश्चिम द्वार श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कळस अशा सगळ्या ठिकाणी ही आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात आलेली दिसून येत आहे. यामध्ये कळसालाही दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.तसेच आज विठ्ठल मंदिराला पांढऱ्या तांबड्या आणि हिरव्या रंगांच्या फुलांनी सजवण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार सोळखांबी , नामदेव महाद्वार अशा विविध ठिकाणी या तिरंगी फुलांची सजावट बघायला मिळत आहे.
दरवर्षी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यदिन अशाच प्रकारे वैविध्यपूर्ण सजावट करून साजरा करण्यात येतो.यावेळी सभामंडप सजवण्यात येतो. तसेच तिरंग्याची आकर्षक आरास करण्यात येते. स्वातंत्र्य दिनानिमित्त विठूमाऊलीलाही विशेष पोशाख चढवला जातो.