भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमधून निराशाजनक बातमी समोर आली असून महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला आता रौप्य पदक मिळणार अखेरीस स्पष्ट झाले आहे. क्रीडा लवादाने ( कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट) विनेश फोगाट हीची याचिका फेटाळली आहे. विनेशने वाढीव वजनानंतर अपात्र ठरवल्यानंतर सीएएसमध्ये धाव घेतली होती. आपल्याला किमान संयुक्तरित्या रौप्य पदक देण्यात यावे ,अशा मागणीची याचिका विनेशने केली होती. मात्र सीएएसने ही याचिका फेटाळून लावली आहे.
विनेशने मंगळवारी 6 ऑगस्ट रोजी 50 किलो वजनी गटात सलग 3 सामने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली होती. विनेश ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिला महिला ठरली. विनेशने प्री क्ववार्टर फायनल सामन्यात टोक्यो ऑलिम्पिक चॅम्पियन यूई सुसाकी हीचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. त्यानंतर क्वार्टर फायनलमध्ये युक्रेनच्या ओक्साना लिवाच हीचा 7-5 अशा फरकाने धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक दिली. त्यानंतर सेमी फायनलमध्ये विनेशने क्यूबाच्या गुजमॅनवर 5-0 ने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.यानंतर विनेशचा अंतिम फेरीतील सामना हा 7 ऑगस्ट रोजी यूएसएच्या एन सारा हिल्डेब्रांट विरुद्ध होणार होता. मात्र त्याआधी विनेशचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं निदर्शनात आल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले .
त्यानंतर विनेश फोगाटने या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, इथे देखील विनेश फोगाटच्या पदरी निराशा आलेली आहे. विनेशच्या याचिकेवर 9 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती. तीन तास ही सुनावणी चालली. विनेश फोगाटकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे आणि विदुष्पत सिंघानिया या दोघांनी युक्तिवाद केला. तर विनेशने व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे आपली बाजू मांडली. तर ऑस्ट्रेलियाच्या डॉ एनाबेले बेनेट या प्रकरणात मध्यस्थाच्या (आर्बिट्रेटर) भूमिकेत होत्या. त्यानंतर क्रीडा लवादाने निर्णय 3 वेळा राखून ठेवला. या प्रकरणात 16 ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजून 30 मिनिटांनी निर्णय येणे अपेक्षित होते. मात्र त्याआधीच स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला असा निर्णयआल्यामुळे विनेशच्या आणि पर्यायाने भारतीयांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून आले.