भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयाच्या आवारात ध्वजारोहण करत सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. देशप्रेमाची ज्योत सर्वांनी आपल्या हृदयात कायम ठेवली पाहीजे. देशातील प्रत्येक घटकाचा विकास ही आपली जबाबदारी आहे. तसेच या जबाबदारीचे स्मरण करून देणारा आजचा हा दिवस असल्याचे ते म्हणाले आहेत. .
गेल्या दोन वर्षात अभूतपूर्व कामगिरीने देशाच्या नकाशावर महाराष्ट्राने आपले नाव कोरले असून राज्याच्या प्रगतीची हीच गती आपल्याला भविष्यात कायम ठेवायची आहे. राज्याचा विकास आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण अशा दोन्ही आघाड्यांवर अभूतपूर्व कामगिरी केली आहे. तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला, शेतकरी, गोरगरीबांसाठी, तरुणांसाठी आपण कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
राज्याच्या विकासाच्या आमच्या प्रयत्नात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्हाला साथ मिळाली. त्यामुळेच आजही महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन वेगाने धावत आहे. त्यामुळे आपली वाटचाल स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने होत आहे. २०४७ मध्ये जगात भारताचे स्थान कसे असावे, याचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जेव्हा आपण विकसित भारत म्हणतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान असेल, असाही विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.