आज ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुर येथे संघ मुख्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. भारतमाता पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सरसंघचालकांसह नागपूर महानगर संघचालक राजेशजी लोया हे देखील उपस्थित होते.यावेळी बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीबाबत सरसंघचालकांनी भाष्य केले आणि तिथे चालू असलेला हिंसाचार चिंताजनक असून तिथल्या अल्पसंख्याक हिंदू समाजाला विनाकारण लक्ष्य बनवण्यात आल्याची खंत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय आणि अत्याचार होऊ नयेत याची काळजी घेणे ही आपल्या देशाची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले आहेत.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की, “बांगलादेशात अनेक अत्याचार होत असून तेथे राहणाऱ्या हिंदू बांधवांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भारताची इतरांना मदत करण्याची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनुभवले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केलेला नाही. उलट, समोरचा कसेही वागत असला तरी आम्ही अडचणीत असलेल्या लोकांना मदतच करीत आलो आहोत”.
या परिस्थितीत आपल्या देशाच्या सुरक्षेसह इतर देशांनाही मदत करणे आवश्यक आहे. भागवत यांच्या मते, अस्थिरता आणि अराजकतेमुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, अन्याय आणि अत्याचाराला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या देशाची जबाबदारी आहे. काही बाबींमध्ये सरकारला स्वतःच्या पातळीवर अश्या समस्यांना सामोरे जात असते आणि लढतही असते पण सरकारला बळ तेव्हाच मिळते जेव्हा समाज आपली जबाबदारी पार पाडतो आणि देशाप्रती बांधिलकी दाखवतो असे भागवत म्हणाले आहेत.