Independence day 2024 : देश आज 15 ऑगस्ट रोजी 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. यानंतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपला स्वतःचाच एक विक्रम मोडला आहे.
यावेळी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून सर्वात लांब भाषण केले. त्यांनी सुमारे 98 मिनिटे देशवासीयांना संबोधित केले. अशास्थितीत पंतप्रधान मोदींनी प्रदीर्घ भाषण करून आपलाच विक्रम मोडला आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून ९० मिनिटे भाषण केले होते. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी 86 मिनिटांचे भाषण करून देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या प्रदीर्घ भाषणाचा विक्रम मोडला. यावर्षी त्यांनी 97 मिनिटांचे भाषण केले.
पंतप्रधान मोदींनी कोणत्या वर्षी आणि किती काळ भाषण केले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत लाल किल्ल्यावरून एकूण 11 वेळा देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी 65 मिनिटे भाषण केले. त्यानंतर 2015 मध्ये त्यांनी 86 मिनिटे देशाला संबोधित केले. देश स्वातंत्र्याचा ७० वा वर्धापन दिन साजरा करत असताना, पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून ९४ मिनिटे देशाला संबोधित केले. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात लाल किल्ल्यावरून दिलेले हे सर्वात मोठे भाषण होते. आता हा विक्रम मोडीत निघाला आहे.
पंतप्रधान मोदींनी एका तासापेक्षा कमी कालावधीसाठी केवळ एकदाच देशाला संबोधित केले. 2017 मध्ये स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांचे भाषण केवळ 56 मिनिटांचे होते. हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वात छोटे भाषण आहे. 2018 मध्ये 82 मिनिटे आणि 2019 मध्ये 92 मिनिटे राष्ट्राला संबोधित केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी 2020 मध्ये 86 मिनिटे, 2021 मध्ये 88 मिनिटे, 2022 मध्ये 83 मिनिटे आणि 2023 मध्ये 90 मिनिटे लाल किल्ल्यावरून भाषण केले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा विक्रम मोडला
मोदींनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या भाषणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मागे टाकले आहे. मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 दरम्यान लाल किल्ल्यावरून 10 वेळा तिरंगा फडकवला होता. या बाबतीत मोदी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहेत. नेहरूंना 17 वेळा तर इंदिराजींना 16 वेळा हा सन्मान मिळाला.