आज दुपारी ३ वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले जात आहे. तर कदाचित जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल असेही सांगितले जात आहे. याशिवाय हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणाही निवडणूक आयोग करणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष गोष्ट म्हणजे हरियाणा विधानसभा निवडणूक ही नेहमी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी एकत्रच होत आली आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोग महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार का याबाबत उत्सुकता आहे. जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणुका एकत्रच जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही 3 नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होऊ शकतात. यादीही 2019 मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात मतदान झाले होते.आता यंदा कधी मतदान होणार? ह्याबाबत निवडणूक आयोग आज घोषणा करेल असे सांगितले जात आहे.
३७० कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका
जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० बाबत गेल्या वर्षी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२४ अगोदर घेण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्तांनी जम्मू काश्मीरचा दौरा करत तयारीचा आढावा घेतला होता. दरम्यान, ३७० कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आज केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीरच्या निवडणुकीबाबत महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.