Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त केलेल्या भाषणात सामान नागरी कायदा (UCC ) यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी देशाला धार्मिक नव्हे तर सांविधानिक कायद्याची गरज असल्याचे म्हंटले होते. मोदींच्या या वक्तव्यावरून आता विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील याबाबत ट्विट करत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
UCC च्या मुद्द्यावरून X वर पोस्ट शेअर करत ओवेसी म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा समान नागरी संहितेचा मुद्दा उपस्थित केला आहे. UCC ची भाजप आवृत्ती हिंदू अविभक्त कुटुंब, अनुसूचित जाती आणि हिंदू चालीरीतींना अपवाद करते. दयाभागा आणि मिताक्षरा यांसारख्या हिंदूंमधील विविध परंपरा आणि संस्कृतींचे काय होईल? उत्तराखंड यूसीसी हे भाजपच्या ढोंगीपणाचे परिपूर्ण प्रकरण आहे. हे उर्वरित भारतीयांवर हिंदू मूल्ये आणि परंपरा लादत आहे.” असे म्हणत टीका केली.
महिलांच्या सुरक्षेबाबतही भाजपचा हल्लाबोल
पुढे त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत भाजपचा हल्लाबोल चढवला. आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवर पोस्ट शेअर करत म्हणाले, “स्वातंत्र्य दिना निमित्त केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. त्यांच्याच सरकारने बिल्किस बानोच्या बलात्कारी आणि तिच्या कुटुंबातील मारेकऱ्यांना सोडण्यास मान्यता दिली. तिने (बिल्किस बानो) न्यायासाठी 15 वर्षे घालवली आणि नरेंद्र मोदी हे बहुतांश काळ गुजरातचे मुख्यमंत्री होते.
पुढे म्हणाले, “खुद्द पंतप्रधानच जर महिलांच्या सुरक्षेचा गांभीर्याने विचार करत नसतील तर सामाजिक बदलाची अपेक्षा कशी करणार, असा आरोपही त्यांनी केला. सत्ताधारी पक्ष जेव्हा दोषी ठरलेल्या बलात्काऱ्यांची सुटका करतो आणि सुटल्यावर त्यांना पुष्पहार घालतो, तेव्हा त्यातून गुन्हेगारांना काय संदेश जातो?”
“हजारो महिलांविरोधातील अत्यंत घृणास्पद गुन्ह्याचा आरोप असलेल्या उमेदवाराचा मोदींनी कर्नाटकात प्रचार केला, भाजप हायकमांडला हे गुन्हे उघड होण्याच्या खूप आधीपासून माहिती होते.” असा दावाही त्यांनी यावेळी केला.