कोलकाता येथील सरकारी रुग्णालयातील ज्युनियर डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या क्रूर घटना घडल्यानंतर त्या विरोधात देशभरात निषेध आणि आंदोलने करण्यात येत आहेत. आता इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने देखील याबाबत आक्रमक पवित्रा घेत मोठी घोषणा केली आहे. 17 ऑगस्ट रोजी 24 तास देशव्यापी बंद करण्यात येणार आहे . त्यामुळे देशभरातील सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. . डॉक्टरांनी एका निवेदनात नमूद केले आहे की, अत्यावश्यक सेवा सुरू असतील. ओपीडी सेवा बंद असतील आणि काही शस्त्रक्रिया देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. ज्यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
आयएमएने म्हटले आहे की, रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्यासोबतच केंद्रीय संरक्षण कायदा तातडीने लागू करावा. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनचे सरचिटणीस अनिल कुमार जे नायक यांनी भूमिका स्पष्ट करत असे म्हंटले आहे की , “आमची मागणी आहे की रुग्णालये सेफ झोन घोषित करावेत. तसेच रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था बळकट करावी. कारण रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या 60 टक्के डॉक्टर आणि परिचारिका महिला आहेत.”
डॉक्टरांची संघटना फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन (FORDA) ने कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या तोडफोडीच्या निषेधार्थ संपावर जाण्याची घोषणा केली आहे. या आधीही त्यांनी २ दिवस संप केला होता मात्र, सरकारशी झालेल्या चर्चेनंतर संप मिटवण्यात आला होता.
.
९ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ संपादरम्यान बुधवारी रात्री काही लोकांनी कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये घुसून प्रचंड तोडफोड केल्याची माहितीही समोर आली आहे. याप्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली होती. .