काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. यासाठी स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली असून त्यावर पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आणि ब्रिटिश पासपोर्ट असल्याचा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. याप्रकरणी न्यायालयाने केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याचिकेत सुब्रमण्यम स्वामी म्हणतात की, त्यांनी 5 वर्षांपूर्वी राहुल गांधींच्या नागरिकत्वाबाबत गृहमंत्रालयाकडे तक्रार केली होती. अद्याप गृह मंत्रालयाने या मुद्द्यावर काय निर्णय किंवा कारवाई केली आहे का हे स्पष्ट केलेले नाही.
सुब्रमण्यम स्वामी यांनी याप्रकरणी केंद्र सरकारकडून स्टेटस रिपोर्ट मागवावा, अशी मागणी केली आहे . 2019 मध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. त्यावेळी त्यांनी राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचा दावा केला होता.सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, युनायटेड किंगडममध्ये 2003 साली बॅकअप्स लिमिटेड नावाची कंपनी नोंदणीकृत झाली होती. त्या कंपनीत राहुल गांधी संचालक आणि सचिव होते. तसेच 2005 आणि 2006 मध्ये दाखल केलेल्या कंपनीच्या वार्षिक रिटर्नमध्ये राहुल गांधींचे राष्ट्रीयत्व ब्रिटिश असल्याचे नमूद करण्यात आले होते, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.