पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण भारत हळहळला. भारताची अव्वल महिला कुस्तीपटू विनेश फोगाट, जी ऑलिम्पिक पदकासाठी प्रबळ दावेदार होती, तिला फक्त १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अंतिम फेरीतून अपात्र ठरवण्यात आले, आणि तिचे पदकाचे स्वप्न अधुरे राहिले.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विनेशचे आगमन होताच तिचे जोरदार स्वागत करण्यात आले. पदक विजेत्यांच्या स्वागतासारखीच तिची मिरवणूक काढली गेली. तिच्या स्वागतासाठी जमलेल्या जनसमुदायाच्या घोषणा आणि उत्साह पाहून विनेश भारावून गेली, तिच्या डोळ्यात अश्रू आले. “सगळ्या देशवासियांचे आभार. मी भाग्यशाली आहे,” असे तिने नम्रपणे सांगितले.
विनेश ५० किलो वजनी गटात स्पर्धा करत होती, पण फक्त १०० ग्रॅम जास्त वजन झाल्याने तिला फायनलमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. सेमीफायनल जिंकून, त्या रात्री तिचे वजन ५२ किलो झाले होते. ती संपूर्ण रात्र मेहनत करत राहिली. सायकलिंग, दोरी उड्या इत्यादी केले परंतु अखेरीस ती फक्त १०० ग्रॅम वजन कमी करण्यात अपयशी ठरली, आणि त्याच कारणामुळे तिला अंतिम फेरीतून बाहेर काढण्यात आले.
फोगाटने जपानच्या न हारलेल्या कुस्तीपटूला चितपट करत सुवर्ण पदकाच्या दिशेने प्रवास सुरू केला होता. त्यामुळे तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. तिचे पदक निश्चित मानले जात होते. तिच्या अपात्रतेने संपूर्ण देश हळहळला.
विनेशच्या अपात्रतेमुळे भारत एक मेडल गमावले, परंतु तिच्या खेळातील उत्कृष्टता आणि देशासाठी केलेल्या संघर्षामुळे तिचे स्वागत एखाद्या हिरोसारखेच झाले. विनेश फोगाटने दाखवलेली जिद्द आणि कौशल्य देशासाठी प्रेरणादायक ठरले आहे.