‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ आज शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी त्यांनी लाडक्या बहिणांना आवाहन करत आणखी एक खूश खबर दिली आहे .जर तुम्ही सरकारला आणखी ताकद दिली तर दिड हजाराचे पावणे दोन हजार, पावणे दोन हजाराचे तीन हजारही होतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून द्या, त्यानंतर लाडक्या बहीण योजनेतील बहिणींची ओवाळणी वाढवता येईल असे ते म्हणाले आहेत. तर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा या योजनेचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले आहे. या पुण्यातील शुभारंभाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे, खासदार श्रीरंग बारणे, सुनील तटकरे, मेधा कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
ही योजना फेल जावी यासाठी विरोधक प्रयत्न करत होते.कोर्टातही गेले होते. काहींनी पंधराशे रूपये देतात याची टिंगल केली. पण जे सोन्याचा चमचा घेवून जन्माला आले त्यांना पंधराशे रूपयांचे मोल काय समजणार असा सवाल शिंदे यांनी यावेळी केला आहे या योजनेबाबत अपप्रचारही केला गेला.निवडणुकीच्या तोंडावर केलेला विरोधकांचा हा जुमला असल्याचे ते म्हणले आहेत. तसेच योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट खटाखट सारखी योजना नाही. ही फटाफट फटाफट चालणारी योजना आहे.असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत इशारा दिला आहे. . “मी एकच सांगतो की एकवेळी आमच्यावरील टीका केली तर आम्ही सहन करू. मात्र, आमच्या बहिणींच्या हिताच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे .
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महिला सक्षम, सबळ झाल्या पाहिजेत यासाठी ही योजना आणली आहे . मात्र कारण नसताना विरोधक टीका-टिप्पणी करत आहेत. आता त्यांच्या कथानकाला बळी पडू नका, परंतु, हे पैसे भाऊबीज म्हणून दिले आहेत. हे मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगतो की पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नका, आत्तापर्यंत एक कोटी तीन लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. राजकीय आयुष्यातील आजचा दिवस सर्वात आनंदाचा दिवस असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.
ही योजना माता-भगिनींच्याप्रती कृतज्ञता आहे. त्यांचे प्रेम, साथ यामुळे आम्हाला यश मिळत आहे. मात्र हे विरोधकांना पाहवत नाही असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. बहिणींना ओवाळणी द्यायची म्हटल्यावर सावत्र भावांच्या पोटात दुखायला लागले. न्यायालयात गेले. न्यायालयाने नाकारल्यानंतर जाणीवपूर्वक अर्जावर पुरुष, दुचाकी, बगीच्याचे छायाचित्र वापरले. अर्ज बाद होण्यासाठी कारस्थान केले. संकेतस्थळ बंद पडण्यासाठी प्रयत्न केले मात्र हे सगळे प्रयत्न फसले.
मात्र महिलांचा विकास झाला तरच भारत पुढे जाईल. त्यामुळे महिला केंद्रीत योजना सुरु केल्या आहेत. लखपती, लेक लाडकी योजना सुरु केली. अर्थव्यस्थेच्या मुख्य धारेत महिलांना भागीदारी मिळाली पाहिजे. महिलांना अर्थव्यस्थेच्या केंद्रात आणल्यास राज्याची अर्थव्यस्था वेगात वाढेल असा विश्वास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.