Kolkata Rape Murder Case : कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयच्या हाती सोपविण्यात आला आहे, सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, शनिवारी सीबीआयने या संदर्भात रुग्णालयाच्या माजी प्राचार्याची जवळपास 13 तास चौकशी केली.
दरम्यान, काल रात्री उशिरा जमावाने रुग्णालयावर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रुग्णालयाभोवती बीएनएस कलम १६३ लागू केले आहे.
कोलकाता पोलिसांनी आजपासून BNSS (भारतीय नागरी संरक्षण संहिता, 2023) (CRPC चे पूर्वीचे कलम 144) अंतर्गत कलम १६३ पुढील सात दिवसांसाठी आरजी कार रुग्णालयाभोवती लागू केला आहे.
प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची 13 तास चौकशी
शनिवारी सीबीआयने आरजी कार हॉस्पिटलचे माजी प्राचार्य डॉ. संदीप घोष यांची दीर्घकाळ चौकशी केली. 13 तासांनंतर संदीप घोष सीबीआय कार्यालयातून बाहेर आले. सीबीआयने आता आरोपी संजय रायची मानसशास्त्रीय चाचणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दिल्लीहून सीएफएसएल टीम शनिवारी कोलकाता येथे पोहोचली. ही टीम आरोपी संजय रॉयची चाचणी घेणार आहे.
या चाचणीद्वारे सीबीआयची टीम आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार असून त्याची मानसिक स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. कोलकाता पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवशी तुटलेले हेडफोन आणि सीसीटीव्हीवरून आरोपींची ओळख पटवली आणि त्यानंतर संजय रायला अटक केली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे.
IMA ने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा आणावा आणि रुग्णालयांना अनिवार्य सुरक्षा अधिकारांसह सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान मोदींना लिहिण्यात आले आहे.
आयएमएने पाच मागण्या :-
1. डॉक्टरांविरोधात होणाऱ्या घटनेसंदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे. महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजना करण्याची गरज आहे.
2. डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात केंद्रीय कायदा कठोर करत ठोस उपाययोजना करण्याची मागणीही या पत्रातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
3. रुग्णालयात सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची व्यवस्था चांगली असण्याची मागणी.
4. डॉक्टरांची शिफ्ट 36 तासांपर्यंत होत असल्यानं महिला डॉक्टर्स आणि निवासी डॉक्टर्सना रेस्ट रुम पुरवाव्यात, असंही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
सोशल मीडियावरून चित्र हटवण्याची मागणी
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून मृत व्यक्तीचे फोटो, नाव आणि ओळख हटवण्याची विनंती करण्यात आली आहे. मृत डॉक्टरचे फोटो आणि त्यांच्या कुटुंबाची ओळख उघड करून कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याचिकेत सोशल मीडियाच्या जवळपास सर्वच मोठ्या व्यासपीठांना पक्षकार बनवण्यात आले आहे. या अर्जावर 20 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.