Champai Soren News : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वीच जोरदार राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन आज (18 ऑगस्ट) कोलकाताहून दिल्लीला पोहोचणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, चंपाई सोरेन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
शनिवारी झारखंडची राजधानी रांची येथे पत्रकारांशी संवाद साधताना, चंपाई सोरेन यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या प्रश्नावर सांगितले, “मी जिथे होतो तिथेच आहे.” यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नसून ते रविवारी सकाळी 6 आमदारांसह दिल्लीला रवाना झाले आहेत. यात दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन हेमब्रोम, समीर मोहंती अशी नावे आहेत.
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना चंपाई म्हणाले होते, “आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत. नंतर सर्वांना सांगेन. काय बातम्या पसरवल्या जातात हे आम्हाला माहीत नाही. कुठे जातोय की नाही हे आम्हाला माहीत नाही.” दुसरीकडे आमदार लोबिन हेम्ब्रम यांनी चंपाई सोरेन यांची भेट घेतली होती, या बैठकीत भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत काही चर्चा झाली का? यावर उत्तर देताना चंपाई म्हणाले, “लोबिन यांच्या सोबत सामान्य गोष्टींवर चर्चा झाली, भाजपबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही.”
मुख्यमंत्री पदावरून हटवल्याने चंपाई नाराज?
हेमंत सोरेन यांना 31 जानेवारीला ईडीने अटक केली तेव्हा त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि चंपाई सोरेन यांच्याकडे कमान सोपवली होती, परंतु जूनमध्ये हेमंत जामिनावर बाहेर आल्यावर त्यांनी पुन्हा सर्व सूत्रे हाती घेतली, यावर चंपाई सोरेन नाखूष असल्याचे मानले जात आहे. तेव्हापासून जेएमएम ( झारखंड मुक्ती मोर्चा) सोडणार असल्याची चर्चा आहे.
.