Pune Burger King Legal Battle : पुण्याच्या बर्गर किंगने जागतिक दिग्गज बर्गर किंगविरुद्ध 13 वर्षे जुनी कायदेशीर लढाई जिंकली आहे. अशा प्रकारे अमेरिकेच्या बर्गरला पुण्याच्या बर्गर किंगने मागे टाकले आहे. या दोन ‘बर्गर किंग्स’मधील लढाई किचनमधून थेट कोर्टात पोहचली होती. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया…
बर्गर किंग हा जगातील प्रसिद्ध ब्रँड आहे. जगातील 100 देशांमध्ये सुमारे यांचे 13 हजार रेस्टॉरंट्स आहेत. पण, कंपनीला भारतात एका अनोख्या समस्येचा सामना करावा लागला. इथे पुणे शहरात बर्गर किंग नावाचे जुने आणि लोकप्रिय रेस्टॉरंट आधीच चालू होते. यानंतर अमेरिकन कंपनीने पुण्यातील या कंपनीवर आपले नाव वापरल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला. भारतात बर्गर किंगच्या नावाने सुरू असलेली ही कायदेशीर लढाई 13 वर्षे चालली. आता निर्णय पुण्याच्या कंपनीच्या बाजूने आला आहे. अमेरिकन MNC बर्गर किंगसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुण्यातील व्यावसायिक न्यायालयाने शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल दिला. अमेरिकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनची याचिका फेटाळत असल्याचे जिल्हा न्यायाधीश सुनील वेद पाठक यांनी 16 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशात सांगितले.
अमेरिकन कंपनीने पुणे येथील कंपनीवर ट्रेडमार्क उल्लंघनासह अनेक आरोप केले होते. पुण्यातील कंपनीला त्यांचे नाव वापरण्यास बंदी घालावी, अशी मागणी कंपनीने न्यायालयाकडे केली होती. शिवाय त्यांना नुकसानभरपाईही देण्याची मागणी केली होती.
पुण्याचे बर्गर किंग रेस्टॉरंट अनाहिता आणि शापूर इराणी चालवतात. कॅम्प आणि कोरेगाव भागात त्यांची रेस्टॉरंट्स आहेत. हे रेस्टॉरंट्स खूप पसंत केले जातात. या प्रकरणी न्यायाधीशांनी सांगितले की, “पुण्याचा बर्गर किंग हे नाव 1992-93 पासून वापरत आहे. अमेरिकन कंपनी खूप नंतर भारतात आली. दुसरीकडे पुण्याची कंपनी हे नाव बराच काळ वापरत होती. अशा स्थितीत त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही. असे न्यायालयाने म्हंटले आहे.
बर्गर किंग कॉर्पोरेशन 2014 मध्ये भारतात
बर्गर किंगची स्थापना 1954 मध्ये झाली. त्याची सुरुवात जेम्स मॅकलॅमोर आणि डेव्हिड एडगरटन यांनी केली होती. ही कंपनी 100 हून अधिक देशांमध्ये 13 हजार रेस्टॉरंट चालवत आहे. या रेस्टॉरंटपैकी 97 टक्के या कंपनीची मालकी आहे. ही जगातील दुसरी सर्वात मोठी फास्ट फूड हॅम्बर्गर कंपनी मानली जाते. यामध्ये सुमारे 30,300 लोक काम करतात. 1982 मध्ये कंपनीने प्रथमच आशियामध्ये प्रवेश केला. पण, तो २०१४ मध्ये भारतात आला. नवी दिल्ली, मुंबई आणि पुणे येथून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.