Eknath Shinde : काल पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लाडकी बहीण या राज्यसरकारच्या योजनेचा शुभारंभ बालेवाडी येथे झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेची रक्कम वाढवण्याबाबत घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ देणार असल्याचे बोलले.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची विरोधकांना वाटतेय भीती परंतू काळजी करु नका तुमच्या पाठी आहे महायुती अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करताना भाषण केले. पुढे ते म्हणाले, “आता दीड हजार देत आहोत. म्हणजेच वर्षाला अठरा हजाराचा लाभ देत आहोत. जर सरकारला ताकद दिली तर दीडचे दोन..दोनचे पावणे दोन हजार होतील पुढे तीन हजार होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ही योजना आमच्या बहिणींना लखपती करण्याची योजना असल्याचे शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी राज्यातील महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये जमा झाले आहेत. 31 जुलैपूर्वी या योजनेसाठी अर्ज भरणाऱ्या महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांच्या बँक खात्यात प्रति महिना 1500 रुपये जमा होणार आहेत. 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे. जून आणि जुलै दोन महिन्यांचा हप्ता बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. 17 ऑगस्टपर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे.