Ajit Pawar : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महारष्ट्रातील सर्वच पक्षांनी कंबर कसली असून, अनेक बडे नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत, अशातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून जन सन्मान यात्रेचं आयोजन करण्यात आलं. या यात्रेदरम्यान जुन्नर तालुका पर्यटन आढावा बैठकीचं देखील आयोजन करण्यात आले होते.
या जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं गुलाबी जॅकेट चर्चेत आहे, तसेच या यात्रेसाठी निवडण्यात आलेला गुलाबी रंग देखील चर्चेचा विषय आहे, अजित पवारांच्या या गुलाबी जॅकेटवरून विरोधांकडून जोरदार टीका होत आहेत, यातच जुन्नरमध्ये आयोजित कार्यक्रमात एका महिलेने अजित पवार यांना तुम्ही गुलाबीच जॅकेट का घालता? असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी याला भन्नाट उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
महिलेने विचारलेल्या या प्रश्नाला उत्तर देत अजित पवार यांनी म्हटले की, गुलाबी रंग जरा खुलून दिसतो, म्हणून घालतो. उद्या महिलांनी सांगितलं की नका घालू हा कलरचा जॅकेट काढा तर काढेल. पण हा कलर जांभळा आहे. जांभूळ खाल्ल्यानंतर बियांना जो कलर असतो हा तो कलर आहे. असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं.”
दरम्यान ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. एकीकडे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार घातला तर आता दुसरीकडे अजित पवारांच्या जनसंवाद यात्रेला भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून जोरदार घोषणाबाजी केली आहे.