Badlapur Crime News : कोलकतामधील हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेला काही दिवसच झाले असून, आता आणखी घटना समोर येत आहे, बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे.
या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच शेकडो संतप्त पालक जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. “आमच्या मुली इथे सुरक्षित नाहीत” अशी पालकांची भावना असून, त्यांनी शाळा प्रशासनाने मुलींच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.
आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी
बदलापूरच्या एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर पालक आणि स्थानिक नागरिकांनी शाळेबाहेर निदर्शने केली. येथे आमच्या मुली सुरक्षित नसल्याचे पालकांचे म्हणणे असून त्यांनी शाळा प्रशासनाकडे मुलींच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी केली आहे.
आंदोलकांची मागणी
शाळेतील तीन ते साडेतीन वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अमानुष कृत्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. अद्यापपर्यंत शाळा प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त पालकांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेने गांभीर्याने पावले उचलावीत, अशा पालकांच्या मागणी आहे.
दरम्यान, याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी घटनास्थळी चोख बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळेने पुढे येऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी पालकांची मागणी आहे.