School Male Cleaner Abuse Girls in Badlapur : कोलकतामधील हॉस्पिटलमध्ये एका महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेला काही दिवसच उलटले असता, आता आणखी घटना समोर येत आहे, बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच शेकडो संतप्त पालक जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन सुरु आहे, ज्यामुळे गेल्या दोन तासांपासून रेल्वे वाहतूक कोलमडली आहे.
दरम्यान, पालकांच्या या आंदोलनाची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून, या संवेदनशील घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याच्या सूचना प्रशासनला दिल्या आहेत. तसंच राज्यातील शाळांमध्ये अशा घटना रोखण्यासाठी कडक नियमावली तयार करणार असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या प्रकरणातील आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून, प्रशासनही या प्रकरणावर सातत्याने लक्ष ठेवून आहे. या घटनेत कायद्यातील प्रत्येक तरतुदींनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तसेच बदलापूरमध्ये ज्या शाळेत ही घटना झाली आहे, त्या शाळेच्या संस्थाचालकांच्या चौकशीचा आदेश दिला आहे. या कर्मचाऱ्यांना शाळेत कोणी नोकरीवर ठेवले, याची देखील चौकशी होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुंबईसह महाराष्ट्रातील कोणत्याही शाळेत अशी घटना घडू नये म्हणून, कडक नियमावली तयार करणार आहोत. बदलापूरमधील या घटनेतील पीडित कुटुंबाला संपूर्ण न्याय मिळेपर्यंत या खटल्याचा पाठपुरावा करत राहणार असून, पालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदेंनी केला.
शाळांना कडक नियमावली
“आपण एक परिवार आहोत. भविष्यात महाराष्ट्रातील कोणत्याच शाळेत अशा घटना घडणार नाही, अशी कडक नियमावली तयार करणार आहोत. यासाठी शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याची पार्श्वभूमी तपासली जाईल, असे नियम तयार केले जातील”, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले आहे.
आंदोलकांची मागणी
शाळेतील तीन ते साडेतीन वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अमानुष कृत्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला.मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेने गांभीर्याने पावले उचलावीत, अशा पालकांच्या मागणी आहे.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी शाळेने पुढे येऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि मुलींच्या सुरक्षेसाठी योग्य ती व्यवस्था करावी, अशी पालकांची मागणी आहे.