Badlapur Crime News : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच शेकडो संतप्त पालक जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन सुरु आहे, आंदोलकांनी शाळा व पोलिसांवर दगडफेक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT)ची स्थापना केली आहे. पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. अशी माहिती फडणवीस यांनी एक्सवर दिली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
बदलापूर येथील घटना दुर्दैवी आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक गठीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
पुढे बोलताना, याप्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही ठाणे पोलिस आयुक्तांना दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, शाळेतील तीन ते साडेतीन वर्षे वयोगटातील दोन विद्यार्थिनींवर केलेल्या अमानुष कृत्याने पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. शाळेच्या गेटवर मोठ्या संख्येने पालक आणि स्थानिक नागरिक जमा झाले आणि त्यांनी शाळा प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला. मुलींच्या सुरक्षेसाठी शाळेने गांभीर्याने पावले उचलावीत, अशा पालकांच्या मागणी आहे.