Badlapur Crime News : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर आज सकाळपासूनच शेकडो संतप्त पालक जमले असून ठिय्या आंदोलनाला बसले आहेत. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु आहे, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली, त्यानंतर तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल सहा तास विस्कळीत झाली.
दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी (SIT) ची स्थापना केली आहे. पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून आता राज्यातील राजकारण देखील चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष नेते भाजप सरकारवर निशाणा साधत टीका करत आहेत, याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी दोषी गुन्हेगाराला समाजासमोर फाशी द्यायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच राज्य सरकार लाडक्या बहिणींसाठी योजना आणत आहे, मग त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार? महायुती सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेची अक्षरश: दाणादाण उडाली आहे. गृहमंत्र्यांनी अधिक लक्ष घालून काम करणे आवश्यक आहे. सरकारने या प्रकरणात कठोर कारवाई करावी. २०० कोटींच्या जाहीराती करून लाडकी बहीण करत काही जण फिरत आहेत, पण या बहिणींची, लेकींची सुरक्षा त्यापेक्षा महत्त्वाची आहे.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत विरोधी पक्ष अशा गंभीर घटनेत फक्त राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलेल आहे.
फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्ष अशा गंभीर घटनात राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचे दुर्देव वाटते. संवेदना बोथट झाल्या आहेत अशा प्रकारचा विरोधी पक्ष आहे असे वाटते. अशा घटना घडतात तेव्हा राजकारण करायचे नसते. पण यांच्या मनात केवळ राजकारण दिसत असून ते बाहेर येत आहे.
त्यांच्यासारख्या व्यक्तीने इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण करणं शोभत नाही. किमान अशा प्रकारच्या संवेदनशील घटना घडतात तेव्हा मोठ्या नेत्यांनी असे वागू नये. जनतेला काय दिलासा देता येईल. न्याय कसा देता येईल असे वागायचे असते. पण सुप्रिया सुळे यांना केवळ राजकारण करायचे आहे”. असं फडणवीस म्हणाले आहेत.