Badlapur School Girl Rape Case : बदलापूर शहरातील नामांकित शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार झाल्याची माहिती समोर आली, या प्रकरणानंतर शाळेच्या बाहेर सकाळपासूनच शेकडो संतप्त पालकांनी आंदोलन सुरु केले. याशिवाय बदलापूरमध्ये ‘रेल रोको’ आंदोलन देखील सुरु झाले, अनेकांनी रेल्वे रुळावर बसून निदर्शने केली, त्यानंतर तोडफोड आणि दगडफेक सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक तब्बल 10 तास विस्कळीत झाली होती.
तब्बल 10 तासानंतर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटातच आंदोलकांना रेल्वे ट्रॅकवरुन हटवण्यात आलं. मात्र पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केली.
दरम्यान, आंदोलनकांना पांगवताना झालेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. बदलापूर स्थानकाबाहेरही आंदोलकांना दगडफेक केली. पोलिसांच्या एका गाडीचीही तोडफोड केल्याची माहिती मिळत आहे.
मध्य रेल्वेवर मोठा परिणाम
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बदलापूरकरांच्या रेल रोकोमुळे 12 मेल एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला होता. यामध्ये कोयना एक्स्प्रेस मार्ग बदलून दिवा-पनवेल असा करण्यात आला. अंबरनाथ-कर्जत दरम्यान जवळपास 30 लोकलची वाहतूक रद्द करण्यात आली होती.