Rajya Sabha By Elections : भारतीय जनता पक्षाने राज्यसभा पोटनिवडणूक २०२४ साठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने 8 राज्यांतील 9 राज्यसभेच्या जागांसाठी ही यादी जाहीर केली. महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांना संधी देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील भाजपचे राज्यसभा उमेदवार असणार आहेत.
3 सप्टेंबरला 9 राज्यांतील राज्यसभेच्या 12 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानेही आपला कार्यक्रम जाहीर केला आहे. यानंतर भाजपने उमेदवारांची घोषणा केली आहे. एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पक्षाने म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने विविध राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी राज्यसभा पोटनिवडणुकांसाठी काही नावांना मंजुरी दिली आहे.
कोणत्या राज्यातून कोणाला दिली उमेदवारी?
आसाममधून मिशन रंजन दास आणि रामेश्वर तेली, बिहारमधून मनन कुमार मिश्रा, हरियाणातून किरण चौधरी, मध्य प्रदेशातून जॉर्ज कुरियन, महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील, ओडिशातून ममता मोहंता, राजस्थानमधून सरदार रवनीत सिंह बिट्टू आणि त्रिपुरातून राजीव भट्टाचार्जी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
रवनीत सिंह बिट्टू यांनी पंजाबमधून लोकसभा निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता, त्यानंतर पक्षाने त्यांना राज्यसभेचे उमेदवार बनवले आहे. केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आल्यानंतर बिट्टू यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती.
कोणत्या राज्यात किती जागा रिक्त होत्या?
महाराष्ट्रात 2, बिहारमध्ये 2 आणि आसाममध्ये 2 जागा रिक्त आहेत. त्याच वेळी, त्रिपुरा, हरियाणा, राजस्थान, ओडिशा, तेलंगणा आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी एक जागा रिक्त आहे. या 12 जागांपैकी 10 जागा अशा आहेत ज्या सदस्यांनी लोकसभा निवडणूक लढवल्यानंतर रिक्त झाल्या आहेत.