ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील चिमुकल्या दोन मुलींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बदलापूरमधील नामांकित शाळेतील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत.संतापाची लाट उसळलेली दिसून येत आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतरकाल बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते.रेल्वे ट्रॅकवर उतरत बदलापूरकरांनी ठिय्या आंदोलन केले तब्बल 11 तास हे आंदोलन सुरु होते. काल संध्याकाळी सहा वाजता रेल्वे ट्रॅकवरून न हटणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला. मग जमावानेदेखील दगडफेक केली. त्यानंतर परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आली. मग संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास रेल्वे सेवा सुरु झाली.
बदलापूर रेल रोको आंदोलन प्रकरणात तीनशेहून अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तर 25 पेक्षा अधिक आंदोलक पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
या पार्श्वभूमीवर आज बदलापूरमधली परिस्थिती पूर्ववत होताना दिसत आहे.सकाळपासून रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे.मात्र बदलापूरमधील इंटरनेट पूर्णपणे बंद आहे. काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर बदलापूरमध्ये कलम 163 लागू करण्यात आले आहे. तर शहरातील दुकाने देखील बंद आहेत.याप्रकरणी राजकीय नेत्यांकडून पोलीस प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक पक्षांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
दरम्यान बदलापूरमधील दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील कर्मचाऱ्यांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना मानवाधिकार आयोगाने नोटीस बजावली आहे. दोन आठवड्यांत सविस्तर अहवाल सादर करण्यात संबंधितांना सांगण्यात आले आहे.