सध्या देशभरात बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेची चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या घटनेवरून आंदोलन करण्यात येत आहे. अवघ्या तीन आणि सहा वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावरूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या घटनेवरून आंदोलन करण्यात येत आहे. याचसोबत आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला या आंदोलनकर्त्यांवरच कारवाई होत असल्याचा प्रकार घडत आहे.यावरूनच राजकीय वातावरण देखील तापले आहे.
यावरच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात लोक रस्त्यावर उतरले मग त्यांच्यावर खटले का दाखल करता असा संतप्त सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
याचसोबत पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, “सर्वोच्च न्यायालयाने तटस्थपणे काम करावे , सर्वोच्च न्यायालय कोलकत्ता घटनेची दखल घेतात, मग महाराष्ट्रातल्या घटनेची दखल का घेत नाहीत? राज्य घटनेचे पालन न्यायालयाने केले पाहिजे, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी म्हणून उद्धव ठाकरे आणि इतर नेते महिला सुरक्षेबाबत नेमके काय करावे ? याबाबत चर्चा करत आहेत.आमचा महिला सुरक्षेबाबात महत्वाचा निर्णय लवकरच येईल. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे हे मिंधेचेच चेले आहेत.ज्यांनी या घटनेचे वार्तांकन केलेल्या महिला बातमीदारावर आगपाखड केली होती. या वामन म्हात्रेंवर गुन्हा दाखल करायला हवा.”
याचसोबत राज्य सरकारची मानसिकता ही पंतप्रधान मोदींची मानसिकता आहे. जे पंतप्रधान कर्नाटकात एका बदनाम बलात्काऱ्याच्या प्रचारासाठी गेले होते. . त्यांना माहीत होते की त्याच्यावर 200 पेक्षा जास्त महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.त्याचे अनेक व्हिडीओही समोर आले आहेत. पण तरीही त्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट दिले गेले.अश्या बलात्काऱ्याला प्रतिष्ठा देणारे नेतृत्व जे महाराष्ट्र सरकार मान्य करते ,त्या सरकारकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? म्हणून बदलापूरकरांनी काल जो आंदोलनाच्या माध्यमातून आक्रोश केला तो याच सत्तेत असलेल्या तो मिंधे सरकार विरोधात होता. असे म्हणत संजय राऊतांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान,हे सरकार काहीच करणार नाही आणि शेवटी गुन्हेगारांना वाचवले जाईल, या उद्रेकातून लोक रस्त्यावर उतरले आहेत असेही संजय राऊत म्हणाले आहेत.