Badlapur School Girl Rape Case : सध्या देशभरात बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेचा संताप व्यक्त केला जात आहे. अवघ्या तीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार होतो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. यावरूनच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. याचसोबत आंदोलनकर्ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत.
दरम्यान, आज या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून पुण्यात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
सुप्रिया सुळे म्हणल्या, “सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या घटनांमुळे महिला आता म्हणत आहेत, आम्हाला दीड हजार रुपये नको आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देतो महिलांना सुरक्षित ठेवा’. ही महिलांची भावना आहे.”
पुढे त्या म्हणल्या, बदलापूर येथील घटनेमध्ये सरकार, ज्यांनी बलात्कार केला त्याची चौकशी करण्याऐवजी ज्यांनी आंदोलन केले त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला म्हणून आंदोलन केल तर या महायुती सरकारमध्ये तो गुन्हा आहे.
आणि जर हा गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा द्यावी. असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुढे महिला जोपर्यंत सुरक्षित होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकाव नाहीतर फाशी द्यावी. असेही म्हंटले आहे.
पुढे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधा त्या म्हणाल्या, देवेंद्रजींनी माझ्यावर किती आरोप प्रत्यारोप केले, त्यांचा अधिकार आहे. हे लोकशाही आहे. त्यांनी जरूर माझ्यावर टीका करावी. मला चालेल पण मी हात जोडून एक आई म्हणून गृहमंत्र्यांना विनंती करते की… महिलांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे, तुम्ही राजाचे गृहमंत्री आहात…संविधानाने आम्हाला आंदोलन करण्यचा अधिकार दिलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलेला असून महिलांविरोधात होणाऱ्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलापूर येथे झालेली घटना अतिशय संवेदनशील आहे. पण सरकार आणि प्रशासनाकडून ती दुर्दैवीपणे हाताळली गेला. लोक रस्त्यावर उतरल्यावर सरकारला याबाबत जाग आली. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
दरम्यान, मंगळवारी बदलापूर येथे झालेल्या आंदोलनात आतापर्यंत 300 जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तर 40 हून अधिक जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे ठाणे पोलिसांनी सांगितले आहे.