Ukraine Russia War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध आता टोकाला पोहोचले असल्याचे पाहायला मिळत आहे. युक्रेनच्या लष्कराने रशियाचे अनेक भागही ताब्यात घेतले आहेत. दरम्यान, आता युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केल्याची बातमी समोर आली आहे.
बुधवारी युक्रेनकडून मॉस्कोवर अनेक ड्रोन डागण्यात आले. मात्र, रशियन सैन्याने सगळे ड्रोन नष्ट केले. रशियन सैन्याने याविषयी माहिती देताना सांगितले की, “लष्कराने 11 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये युक्रेनमधील युद्ध सुरू झाल्यापासून राजधानीवर झालेला हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे.”
‘आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला’
मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी सांगितले की, पोडॉल्स्क शहरावर काही ड्रोन नष्ट करण्यात आले. मॉस्को प्रदेशातील हे शहर क्रेमलिनच्या दक्षिणेस सुमारे 38 किलोमीटर अंतरावर आहे. सोब्यानिन यांनी बुधवारी पहाटे टेलिग्रामवर सांगितले की ड्रोनचा वापर करून मॉस्कोवर हल्ला करण्याचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रयत्न आहे. सोब्यानिन यांनी सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार सुदैवाने हल्ल्यानंतर कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
दरम्यान, या हल्ल्यापूर्वी मंगळवारी रशियाने युक्रेनचे आणखी एक शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला होता. रशियन सैन्याने सांगितले की, त्यांनी पूर्व युक्रेनमधील न्यू यॉर्क ताब्यात घेतला आहे, जो रणनीतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण लॉजिस्टिक हब आहे. हे संपूर्ण डोनेस्क प्रदेश काबीज करण्यात मदत करेल. दुसरीकडे, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर यांनी सांगितले की, युक्रेनच्या सैन्याने पश्चिम रशियाच्या कुर्स्क भागातील 1,250 चौरस किलोमीटर क्षेत्रावर कब्जा केला आहे. त्यात 92 वसाहतींचा समावेश आहे.