Jay Shah : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) विद्यमान अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी 30 नोव्हेंबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंगळवारी तिसऱ्या टर्मच्या शर्यतीपासून स्वतःचे नाव मागे घेतले आहे. अशास्थितीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांची या पदासाठी चर्चा होत आहे.
या पदासाठी शाह आपला दावा मांडणार की नाही हे 27 ऑगस्टपर्यंत स्पष्ट होईल, ही अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आयसीसी अध्यक्ष प्रत्येकी दोन वर्षांच्या तीन टर्मसाठी पात्र आहेत आणि न्यूझीलंडचे वकील बार्कले यांनी आतापर्यंत 4 वर्षे पूर्ण केली आहेत.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी बोर्डाला ते तिसऱ्या टर्मसाठी उभे राहणार नाहीत आणि नोव्हेंबरच्या अखेरीस त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर पद सोडतील, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. बार्कले यांची नोव्हेंबर 2020 मध्ये ICC चे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2022 मध्ये त्यांची या पदावर पुन्हा निवड झाली.
जय शाह ICC चेअरमन होण्याची अपेक्षा का?
शाह हे आयसीसी बोर्डातील सर्वात प्रभावशाली चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. ते सध्या आयसीसीच्या शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार उप-समितीचे प्रमुख आहेत.
सध्या, शाह यांच्या बीसीसीआय सचिवपदाच्या कार्यकाळात एक वर्ष शिल्लक आहे, त्यानंतर त्यांना ऑक्टोबर 2025 पासून तीन वर्षांचा अनिवार्य ब्रेक (कूलिंग ऑफ कालावधी) घ्यावा लागेल.
सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या बीसीसीआयच्या घटनेनुसार, पदाधिकारी तीन वर्षांच्या कूलिंग ऑफ कालावधीपूर्वी सहा वर्षे पदावर राहू शकतो. तर एखादी व्यक्ती एकूण 18 वर्षे या पदावर राहू शकते.
शहा बनतील सर्वात तरुण चेअरमन?
जर शाह यांनी त्यांच्या सचिवपदावर एक वर्ष शिल्लक असताना आयसीसीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्याकडे बीसीसीआयमध्ये चार वर्षे शिल्लक राहतील. वयाच्या 35 व्या वर्षी ते ICC इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष होऊ शकतात. जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या भारतीयांनी भूतकाळात ICC चे नेतृत्व केले आहे.