Pakistan Parliament : पाकिस्तान अनेक समस्यांचा सामना करत असतानाच आता त्यांच्यासमोर एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकीकडे देश आर्थिक संकटातून जात आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानच्या संसदेत उंदरांनी दहशत माजवली आहे. यावर उपाय म्हणून पाकिस्तानने एक भन्नाट आयडिया शोधली आहे, ज्यासाठी 12 लाखांचा बजेट देखील निश्चित करण्यात आला आहे.
संसदेतील या उंदरांचा सामना करण्यासाठी पाकिस्तानी संसदेत मांजरांना कामावर ठेवण्यात येणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, पाकिस्तानच्या कॅपिटल डेव्हलपमेंट अथॉरिटीने (सीडीए) सरकारी फाइल्सच्या सुरक्षेसाठी मांजर पाळण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी 12 लाख पाकिस्तानी रुपयांचे बजेटही निश्चित करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या संसदेत उंदीर-मांजरांच्या बातम्या ऐकायला विचित्र वाटेल, पण इथले खासदार आणि कर्मचारी या समस्येने इतके हैराण झाले आहेत की त्यांना काहीच विचार करता येत नाही. संसद भवनात उंदरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. उंदरांची ही समस्या नवीन नसून अलीकडच्या काळात ती अधिक गंभीर बनली आहे. उंदीर केवळ कागदपत्रेच फाडत नाहीत तर संगणकाच्या तारांचेही नुकसान करत आहेत. याशिवाय उंदरांमुळे संसदेत घाण आणि आजारांचा धोकाही वाढला आहे.
या सर्व परिस्थितीवर मांजरी पाळण्याचा उपाय पाकिस्तानने योजला आहे. संसदेत उंदीर पकडण्यासाठी मांजरांची खरेदी केली जाईल, असा निर्णय आता घेण्यात आला आहे. असे मानले जाते की मांजरी उंदरांना मारण्यात आणि पळवून लावण्यासाठी उपयुक्त ठरतील. मात्र, काही लोक या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत असले तरी बहुतांश लोक याला एक प्रभावी आणि व्यावहारिक उपाय मानत आहेत.
खासदार काय म्हणतात?
संसदेचे कामकाज कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरळीत चालले पाहिजे, असे खासदारांचे म्हणणे आहे आणि त्यात उंदरांचा प्रश्न मोठा अडथळा ठरला आहे. संसद भवनात स्वच्छता राखणे आणि संसदेच्या कामकाजात कोणताही अडथळा येणार नाही याची काळजी घेणे हा असे पाऊल उचलण्यामागचा हेतू आहे.
हे पाहणे मनोरंजक असेल
बरं, एक गोष्ट मात्र खरी की या प्रकरणाकडे केवळ पाकिस्तानातीलच नव्हे तर जगभरातील लोकांचे लक्ष वेधले गेले आहे. उंदरांमुळे हैराण झालेल्या पाकिस्तानची संसद आता मांजरांच्या माध्यमातून या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. हा उपाय कितपत यशस्वी होतो आणि त्यामुळे खरोखरच उंदरांपासून सुटका होते का हे पाहणे मनोरंजक ठरेल.
गाढवही प्रसिद्ध!
हा तर उंदीर आणि मांजरांचा मुद्दा आहे, पण इथे पाकिस्तानची गाढवे देखील खूप प्रसिद्ध आहेत. पाकिस्तान सरकारनेही गाढवांद्वारे नफा कमविण्याची योजना आखली आहे. जगात सर्वाधिक गाढवे पाकिस्तानात आढळतात. पाकिस्तान सरकार चीनला गाढवांची निर्यात करते. यामुळे पाकिस्तानातील 80 लाख गाढव पाळणाऱ्यांचे उत्पन्न 40 टक्क्यांनी वाढले असून पाकिस्तान सरकारला परकीय चलनही मिळाले असल्याचा दावा अर्थमंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी केला होता.