Sharad Pawar : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करावा तसेच आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही एकाच दिवशी न ठेवता त्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी ते यावेळी करत आहेत.
मंगळवार पासून विद्यार्थी पुण्यातील शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलनाला बसले आहेत आणि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
दरम्यान, या विद्यार्थी आंदोलनाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा दर्शवला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनात सहभागी होण्याचा इशाराही शरद पवारांनी यावेळी दिला आहे.
काल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जात विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि आंदोलनाला पाठिंबा दिला. आता शरद पवार यांनी X वर पोस्ट शेअर करत लवकरच यावर तोडगा काढा अन्यथा आम्ही या आंदोलनात सहभागी होऊ असा इशारा दिला आहे.
https://x.com/PawarSpeaks/status/1826324638814630279
काय म्हणाले शरद पवार?
“पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.” अशी पोस्ट करत शरद पवारांनी विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतली असून, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर लवकरच तोडगा काढू असे बोलले आहे, याच पार्श्ववभूमीवर आज एमपीएससी आयोगाने आज बैठक बोलावली आहे. ही मुंबईत ही बैठक होणार आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थींच्या मागण्यांबाबत काय निर्णय लागणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून आहे.