MPSC Student Protest : पुण्यात मंगळवार पासून MPSCच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषि विभागाच्या २५८ पदांचा समावेश करावा तसेच आयबीपीएस आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन्ही एकाच दिवशी न ठेवता त्याची तारीख बदलण्यात यावी अशी मागणी केली होती.
आता विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आजच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल, असा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. गेल्या तीन दिवसापासून विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत.
पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. तसेच आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सरकारला सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली होती.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सरकारला अल्टिमेटम दिला होता. “पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही तर पुण्याच्या आंदोलनस्थळी मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार.” असा इशारा सरकारला दिला होता.