मुंबईहून केरळला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात आज, गुरुवारी बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून आलेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या टॉयलेटमध्ये बॉम्बचा धमकीचा संदेश लिहिलेला आढळला. त्यानंतर तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली. विमानतळाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. विमानाच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर ‘देअर इज अ बॉम्ब इन फ्लाइट’ असा संदेश सापडला होता, त्यानंतर पायलटने एटीसीला याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भातील माहितीनुसार एअर इंडिया फ्लाईटने आज, गुरुवारी पहाटे 5.45 वाजता 135 प्रवाशांसह केरळसाठी उड्डाण केले होते. नियोजित वेळापत्रकानुसार हे विमान सकाळी 8.10 वाजता केरळच्या तिरुअनंतपुरम विमानतळावर लँड होणार होते. दरम्यान फ्लाइटच्या वैमानिकाने विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रणाला बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. यानंतरच तिरुअनंतपुरम विमानतळावर इमर्जन्सी जाहीर करण्यात आली. बॉम्बच्या धमकीमुळे हे विमान निर्धारित वेळेच्या आधीच विमानतळावर आणण्यात आले. या विमानातील सर्व 135 प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून विमान आयसोलेशनमध्ये नेण्यात आले. तेथे विमानाची कसून तपासणी करण्यात आली असून त्यात काही बॉम्बसदृश वस्तू सापडली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, “सर्व प्रवासी आणि कर्मचारी (विमानातून) सुरक्षितपणे उतरले आहेत.. तसेच विमानतळाशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, विमान सकाळी ८ वाजता विमानतळावर उतरले आणि त्यानंतर त्याला ‘आयसोलेशन बे’ मध्ये नेण्यात आले. तसेच सकाळी 8.44 पर्यंत प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
सूत्रांनी सांगितले की जेव्हा विमान तिरुअनंतपुरम विमानतळावर पोहोचले तेव्हा पायलटने सकाळी 7.30 वाजता बॉम्बच्या धोक्याची माहिती दिली, त्यानंतर सकाळी 7.36 वाजता विमानतळावर संपूर्ण आणीबाणी घोषित करण्यात आली.मात्र आता प्रत्येकजण सुरक्षित आहे.तसेच विमानतळावरील कामकाजात कोणताही अडथळा आलेला नाही.