Badlapur School Girl Rape Case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत. शाळेतील दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत दखल घेतली असून कोर्टात या प्रकरणी आज तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीवेळी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात खडेबोल सुनावले आहेत. याप्रकरणी आता पुढील सुनावणी मंगळवारी होणार असल्याचं सांगितलं आहे.
काय म्हणाले अक्षय शिंदेचे आई-वडील?
दरम्यान, आता आरोपी आता अक्षय शिंदेच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर येत आहे. पालकांनी मुलगा अक्षय शिंदे निर्दोष असल्याचा दावा केला आहे. अक्षयचे आई वडील माध्यमांशी बोलतांना म्हणाले, “अक्षयला फक्त 15 दिवस झाले होते शाळेत कामाला लागून, 17 तारखेला त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. अक्षयला कोणत्या कारणावरून धरुन नेलं आम्हाला सांगण्यात आले नाही. पोलिसांनी अक्षयला मारहाण केली आणि माझ्या लहान मुलालाही मारले. चौकीत गेल्यावर पोलिसांनी सांगितलं की, तुमच्या मुलाने चुकीचा प्रकार केला आहे. अक्षय फक्त ११ वाजता बाथरुम धुवायला जात होता. बाकी कुठलंही काम दिलेले नव्हते. त्यानंतर शाळेत झाडू मारायचा. संध्याकाळी साडेपाच वाजता शाळा सुटली की झाडू मारायला जायचा. आमचं सगळं कुटुंबच तिथे कामाला होतं. माझ्या मुलाने हा काही प्रकार केलेला नाही.’ असे पालकांचे म्हणणे आहे.
काय आहे प्रकरण?
ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका प्रसिद्ध शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली. शाळेतील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्याने या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला असल्याचे समोर आहे. या प्रकरणी आरोपी म्हणून अक्षय शिंदेला अटक करण्यात आली आहे.