सध्या देशभरात बदलापूरच्या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. शाळेतील सफाई कामगाराने दोन चिमुकल्यांवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला. यानंतर बदलापूरमध्ये अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. या आंदोलनावरुन राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू आहे.हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे देखील म्हटले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाबाबत संशय व्यक्त करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. यावरुनच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री हे संशयी आत्मा असून त्यांनी आमच्यावर संशय व्यक्त करणे साहजिक आहे. परंतु बदलापूर घटनेचे पडसाद राज्यभर उमटताना दिसत आहेत.
चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात बलात्काराची अशीच घटना घडली, तो खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला दोन महिन्यांपूर्वी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रत्नागिरीत बोलताना केला होता. यावरुनही संजय राऊत यांनी शिंदेंना चांगलेच धारेवर धरले आहे. या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, मुख्यमंत्र्यांच्या कोणत्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे.कोणत्या कारागृहात या आरोपीला मुख्यमंत्र्यांनी फाशी दिली ? कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवले आहे ? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले आणि या सर्व बाबींचा तपशील मुख्यमंत्र्यांनी द्यावा असे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची आणि त्यांनी परस्पर कोणाला फाशी दिली याची कसून चौकशी व्हावी आणि याची काही नोंद असेल तर ती महाराष्ट्रासमोर आणावी असे आव्हान महाराष्ट्राच्या राज्यपालांना संजय राऊत यांनी केले आहे.