Rahul Gandhi : जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आहे. राज्यातील निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी हे बुधवारी श्रीनगरमध्ये पोहोचले.
येथे पोहचल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी गुरुवारी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला आणि इतर नेत्यांची भेट घेतली. या बैठकीनंतर, NC अध्यक्षांनी जाहीर केले की, आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (NC) एकत्रितपणे सर्व 90 विधानसभा जागा लढवतील.
बैठकीनंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले, “आम्ही आणि काँग्रेस एकत्र आहोत. सीपीआय-एम देखील आमच्याशी जोडली गेली आहे. ही निवडणूक आम्ही जिंकू असा विश्वास आहे. पुढे ते म्हणाले, “विधानसभेच्या सर्व 90 जागांवर दोन्ही पक्षांमध्ये युती आहे. आज रात्रीपर्यंत पेपरवर्क पूर्ण होईल. काँग्रेस, एनसी आणि सीपीआय (एम) एकत्र आहेत. आम्ही एकत्र काम करू आणि निवडणूक लढवू. पुढे त्यांनी राज्याचा दर्जा मिळण्याबाबत आशा व्यक्त केली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याच्या वक्तव्यावर फारूख अब्दुल्ला म्हणाले की, राज्याचा दर्जा आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचा आहे. “आम्ही ते वचन दिले आहे.”
या राज्याने वाईट खूप दिवस पाहिले आहेत. आम्हाला आशा आहे की, राज्याला पूर्ण स्वायत्तता मिळेल आणि आम्ही या प्रकरणात सर्व प्रकारे भारत आघाडीसोबत उभे आहोत.
जेव्हा पत्रकारांनी फारुख अब्दुल्ला यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार का, असे विचारले तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे उत्तर देण्यास टाळले होते.
तीन टप्प्यात निवडणुका होणार
16 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुका जाहीर केल्या होत्या. विधानसभेच्या ९० जागा असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यातील निवडणूक १८ सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक १ ऑक्टोबरला होणार आहे. त्याचबरोबर हरियाणातील सर्व 90 जागांवर एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. निवडणुकीचा निकाल ४ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.