गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सूरू आहे. कृषी विभागातील जागांचा समावेश राज्यसेवा आयोगात करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. याचसोबत राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएस परीक्षा एकाच दिवशी असून त्याच्या तारखा बदलून पेपर वेगवेगळ्या दिवशी व्हावेत अशी मागणी देखील विद्यार्थ्यांकडून होत होती.
विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची दखल एमपीएससीने घेतली असून यावरती आयोगाची गुरुवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत एमपीएससी विद्यार्थ्यांच्या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या असून, नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही 25 ऑगस्ट ऐवजी पुढे ढकलण्यात आली आहे.
यासोबत कृषी विभागाच्या 258 जागांची भरती देखील लवकरात लवकर करण्याचे आश्वासन आयोगाने दिले आहे. विद्यार्थ्यांच्या या दोन मागण्या पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 25 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा आयोगाने जरी निर्णय घेतला असला तरी अनेक विद्यार्थी इतर मागण्यांवरती ठाम आहेत.
आयोगाकडून दोन मागण्या मान्य झाल्यावर रोहित पवार, रूपाली पाटील आणि भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एमपीएससीचे काही विद्यार्थी संयुक्त पूर्वपरीक्षेच्या गट ‘ब’ आणि गट ‘क’च्या पंधरा हजार जागा भरण्याची मागणी करत आहेत आणि ही मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, “हे आंदोलन तुमचे असून आंदोलन थांबवायचे की पुढे न्यायचे हा निर्णय सर्वस्वी तुमचा आहे मी याबाबत उद्या मुख्यमंत्र्यांशी भेट घेतो. यानंतर देखील सरकारने या परीक्षेबाबत योग्य तो निर्णय घेतला नाही तर मी आयोगा समोर आंदोलनाला बसायला तयार आहे” असे देखील रोहित पवारांनी यावेळी विद्यार्थ्याना सांगितले असल्याची माहिती समोर येत आहे.