मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बिनबुडाची टीका करणारे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी माफी मागावी अशी मागणी शिवसेना सचिव व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी केली. मावळमधील महिला अत्याचार प्रकरणी दोषीला जलदगती न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर वड्डेटीवार यांनी टीका केली होती. मात्र विरोधी पक्ष नेते पदावरील व्यक्तीला एखाद्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याचे माहित नसणे म्हणजे त्यांचा अभ्यास कमी आहे, होमवर्क कच्चा असल्याचे दिसून येते, अशी घणाघाती टीका डॉ. कायंदे यांनी केली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्याला १८ तास काम करणारे कार्यसम्राट मुख्यमंत्री मिळाले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना ही श्रीमंतांसाठी नाही तर सर्वसामान्य घरातील महिलांसाठी आणली आहे ज्या महिला पै पै साठवून ठेवतात. ही योजना घोषित झाल्यापासून तुमची पोटदुखी सुरु झाली. या योजनेला बदनाम करण्यासाठी तुम्ही वेगवेगळी कारणे शोधत आहात. खरतर तुम्हाला लाज वाटायला हवी, अशा शब्दांत डॉ. कायंदे यांनी वड्डेटीवार यांना फटकारले. त्या पुढे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपामध्ये प्रवेश करुन वड्डेटीवार आणि त्यांच्या मुलीला निवडणूक लढवायची होती. तुमच्यातील किती लोक महायुतीत प्रवेश करुन लोकसभा निवडण्यासाठी किती आसूसलेले होते, हे सर्वांना माहित आहे. आता केवळ विरोधासाठी विरोध करायचा म्हणून वड्डेटीवार बेताल वक्तव्य करत आहेत.
बदलापूरातील घटनेबाबत सर्वच यंत्रणा अँक्शन मोडवर काम करत आहेत. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे आणि त्यावर बदलापूरकरांचा उद्रेक झाला हे देखील रास्त आहे. परंतु काही मंडळींनी रेल्वे स्टेशनवर रेल रोको केला. या आंदोलनात लाडकी बहिण योजनेचे अचानक फलक कुठून आले हा देखील प्रश्न आहे. विरोधक कुठपर्यंत राजकारण करणार असा सवाल डॉ. कायंदे यांनी केला.
एकसारखं घटनाबाह्य सरकार म्हणायचे आणि सरकारकडूनच सगळ्या अपेक्षा करायच्या. नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोनुसार २०१९ ते २०२१ या महविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातील १७८४०० महिला बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे बदलापूर येथील घटनेचे राजकारण करु नका, अशी टीका डॉ. कायंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
बदलापूरातील आंदोलनाच्या दिवशी उद्धव ठाकरे काँग्रेसच्या मेळाव्यात पट्टा घालून उपस्थित होते. आदित्य ठाकरे नाशिकमध्ये निवडणुकीची तयारी करत होते तेव्हा त्यांना बदलापूर दिसले नाही का? अशी खरमरीत टीका शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी केली. स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून अशी दुटप्पी भूमिका उबाठा घेत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला विरोध करण्यासाठी विरोधक घाणेरडं राजकारण करत आहेत. हिंदू संस्कृतीतील पुजाविधींना जादूटोणा म्हणणाऱ्या संजय राऊत यांचे हिंदुत्व तपासायला हवे, अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांचे स्वप्ना पाटकर सोबतचे संभाषण, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगणा राणावत, केतकी चितळे यांच्याशी तुम्ही कसे वागलात, आदित्य ठाकरे हे दिशा सालियन केसबाबत कधी बोलले नाहीत, त्यामुळे आपण देखील काचेच्या घरात राहतात याचा विचार विरोधकांनी करावा, असे म्हात्रे म्हणाल्या.