Sanjay Raut : राज्यात आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरु झाली आहे, अशातच उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रीपदाची याचना करत आहेत. यापूर्वी देखील त्यांनी अमित शाह यांच्यावर बंद खोलीतून मुख्यमंत्रीपदाच्या शब्दाचा आरोप लावला होता. असाच आरोप ते यापुढे शरद पवारांवर लावतील, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
संजय राऊत यांनी आज जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, “चंद्रशेखर बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस असल्याचे म्हणत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे ही एक राजकारणातली वाया गेलेली केस आहे. त्यांच्या कामटी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष 30 हजारांनी मागे आहे. त्यामुळे त्यांच्या मनावर परिणाम झालेला असू शकतो. आम्हाला कोणाचीही याचना करण्याची गरज नाही. आम्ही महाविकास आघाडीची भूमिका मांडली आहे. एक चेहरा आपण समोर आणला पाहिजे. बावनकुळे यांनी चौपाटीवर कान साफ करून घ्यावे. काँग्रेस-राष्ट्रवादीने कोणताही उमेदवार द्यावा मी त्याला पाठिंबा देईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. हे बावनकुळे यांना ऐकू येत नसेल तर त्यांनी कानाचे ऑपरेशन करून घ्यावे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांनी यावेळी बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेवर देखील भाष्य केले, तसेच पोलिसांना घर गड्यासारखे वागवले जात असल्याची टीका त्यांनी यावेळी केली आहे.
बदलापूर घटनेवर बोलताना ते म्हणाले, ‘या घटनेत पोलीस अधिकारी दखल घेत नव्हते. शाळा सत्ताधाऱ्यांशी संबधित होती. यात संस्था चालक जबाबदार आहे अस म्हणत नाही, मात्र संस्था बदनाम होईल म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर हे गंभीर आहे. पोलीस दखल घेत नाही, हे कठीण आहे. पोलीस सुद्धा यात जबाबदार आहेत. ठाणे पोलीस हे मिंधे गँगचे अधिकारी आहेत. खाकी वर्दीमधील निर्जीव लोक आहेत. खाकी वर्दीमुळे यांना आपण पोलीस म्हणतो, राज्यात पोलिसांना घर गड्यासारखे वागवले जात आहे.”