Maharashtra Band : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.
या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. विरोधी पक्षांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारवर तीव्र टीका केली आहे. चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे. यावेळी ठाकरे यांनी राज्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
उद्या होत असलेल्या महाराष्ट्र बंदमुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमिवर जाणून घेऊया की महाराष्ट्र बंद दरम्यान कोणत्या सेवा सुरू असतील आणि कोणत्या बंद.
कोणत्या सेवा सुरू?
राज्यात महाविकास आघाडीने उद्या बंद पुकारला असला तरी राज्यातील आरोग्य सेवा जसे की, क्लिनिक्स, रुग्णालये आणि मेडिकल्स नियमितपणे सुरू राहतील.
4 ऑगस्टच्या भारत बंदच्या दिवशी शनिवार आहे. त्यामुळे ते नियमित सुरू राहण्याची शक्यता आहे. पण ज्या शाळा महाविद्यालयांना शनिवार-रविवार सुट्टी असते ते नेहमी प्रमाणे बंदच राहतील.
या महाराष्ट्र बंदला राज्य सरकारचा पाठिंबा नाही. त्यामुळे राज्यातील एसटी, रेल्वे आणि सीटी बस सेवा सुरू राहणार आहे.
कोणत्या सेवा बंद?
महाराष्ट्र बंदबाबत अद्याप राज्य सरकारने अधिकृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. तरी पोलीस प्रशासन सतर्क आहे. दरम्यान सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी अधिकारी उपाययोजना करत आहेत.
दरम्यान महाराष्ट्र बंद दरम्यान काही ठिकाणी खाजगी कार्यालये बंद राहण्याची शक्यता आहे. यासह छोटे-मोठे व्यावसायही यामुळे बंद राहू शकतात.
24 ऑगस्ट रोजी शनिवार आहे. हा महिन्याचा चौथा शनिवार आहे. आरबीआयच्या नियमानुसार महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते.
महाराष्ट्र बंद विरोधात सदावर्ते हायकोर्टात
उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतरांनी याचिका दाखल केली आहे. बंद पुकारणे हे बेकायदेशीर असल्याची याचिका त्यांनी दाखल केली आहे. बंद हा आर्थिक नुकसान करणे त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जीडीपी वर परिणाम होणारा असणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे, तसेच या याचिकेत मविआने विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन बंद पुकारल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बंद पूर्णपणे बेकायदेशीर असून बंद पुकारण्याचा अधिकार कोणालाही नाही असेही याचिकेत म्हटले आहे.