महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद पुकारला आहे. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस या बंदमध्ये सामील होणार आहेत. बदलापूर येथील दोन चिमूरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या बंदमुळे उद्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे. या बंदचा सार्वजनिक सेवांवरही परिणाम होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात या बंदबाबतची याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी करण्यात येत असून आज दुपारीच त्यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीने उद्या पुकारलेला महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असून लहान मुलींवरच्या च्या अत्याचाराच्या गलिच्छ राजकारण महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप करत डॉ. गुणरत्न सदावर्तेंसह इतरांची उद्याच्या बंद विरोधात याचिका दाखल केली आहे. महाविकास आघाडीने आगामी विधानसभा निवडणूका लक्षात घेता बंद पुकारल्याचा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. या बंदमुळे शाळा, महाविद्यालय, रूग्णालय, यांच्यासह सर्वसामान्य जनता भरडली जाणार असल्याचा आरोपही याचिकेमध्ये करण्यात आला आहे.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आता चालू आहे. 24 ऑगस्टचा बंद पूर्णपणे बेकायदेशीर आहे तसेच कुणालाही अश्याप्रकारे बंद पुकारण्याचा अधिकार नाही. बंद करणा-यां आंदोलकांवर कायदेशीर कारवाई केली जावी असे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात सरकारच्यावतीने स्पष्ट केले आहे.
जर याबाबत कायदा स्पष्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच निर्देश दिलेले आहेत तर आमच्या हस्तक्षेपाची गरज काय? तसेच जर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे तर यात कोर्टाला का खेचताय?असे मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना सवाल विचारले असल्याची माहिती समोर येत आहे.