Maharashtra Band : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून जोरदार आंदोलन केले.
या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले आहेत. विरोधी पक्षांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारवर तीव्र टीका केली आहे. चिमुकल्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामध्ये काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना सहभागी होणार आहे.
यावरच आता भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मविआला चांगलेच सुनावले आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, “२४ तारखेला मविआने बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंदची हाक दिली आहे. मात्र मला त्यांना काही घटनांची आठवण करून द्यायची आहे. अशी घटना कुठेही घडली तरी ती राज्यासाठी लज्जास्पद आहे. आमचे सरकार कुठेही कमी पडलेले नाही. या घटनेवर सरकारने त्वरित कारवाई केली आहे. ज्या ज्या गोष्टी हव्या, त्या तात्काळ केल्या. एसआयटी स्थापन केली. ज्या पोलिसांनी कारवाईत कसूर केली, त्यांना निलंबित केले. उज्ज्वल निकम सारख्या वकिलांची नेमणूक केली. लहान मुलीकडून माहिती घेणे पोलिसांसाठी टास्क आहे” असं त्या म्हणाल्या.
पुढे, “बदलापूरमधील रहिवाशांनी सांगितले की 10 वाजेपर्यंत आम्ही होतो. त्यानंतर दुसरे लोक आले. त्यांच्या हातात बॅनर आले. लाडकी बहिण योजना नको. नेमके कशासाठी आपण आलो होतो. बदलापूर घटनेत न्याय हवा की लाडकी बहिण योजना नको म्हणून आलो होतो?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.