PM Modi greets Ukraine President Zelenskyy : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवशीय पोलंड दौऱ्यावरून शुक्रवारी युक्रेन दौऱ्यावर पोहोचले. कीवमध्ये त्यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. झेलेन्स्कीसोबतची त्यांची भेटीची शैली खूपच वेगळी होती. जी सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
भेटीसाठी पीएम मोदी पुढे आले आणि त्यांनी झेलेन्स्की यांच्या सोबत हात मिळवला आणि मिठी मारली. यानंतर ते झेलेन्स्की यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत राहिले. मोदी आणि झेलेन्स्की यांची ही भेट हुतात्मा विज्ञान प्रदर्शनात झाली. मोदींनी यावेळी कीवमधील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि पुढील दौऱ्याला सुरुवात केली.
मोदींचा युक्रेन दौरा रशिया-युक्रेन युद्धादरम्यान अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. 1991 नंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच युक्रेन भेट आहे. सुमारे दीड महिन्याच्या रशिया दौऱ्यानंतर नरेंद्र मोदी युक्रेनमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, मोदींच्या रशिया दौऱ्यावर युक्रेनने तीव्र आक्षेप व्यक्त केला होता आणि झेलेन्स्की यांनी याबाबत नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली होती. त्यांनी मोदी आणि पुतीन यांच्या मिठीवर निराशा साधत हा शांतता प्रयत्नांना धक्का असल्याचे म्हटले होते. मोदींच्या रशिया दौऱ्यावर अमेरिकेनेही नाराजी व्यक्त केली होती. मात्र, विश्लेषकांनी मोदींचा रशिया दौरा हा दोन्ही देशांमधील तणाव नियंत्रणात आणण्यासाठी असल्याची म्हंटले आहे.
#WATCH | PM Modi and Ukrainian President Volodymyr Zelenskyy honour the memory of children at the Martyrologist Exposition in Kyiv pic.twitter.com/oV8bbZ8bQh
— ANI (@ANI) August 23, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी कीव येथे पोहोचले तेव्हा तेथे उपस्थित भारतीयांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. ट्विटरवर याचा संदर्भ देत पीएम मोदींनी लिहिले की आज सकाळी ते कीवला पोहोचले तेव्हा भारतीय समुदायाने स्टेशनवर अप्रतिम स्वागत केले. स्टेशनवर स्वागत केल्यानंतर ते हॉटेलमध्ये गेले. येथेही भारतीय समाजातील लोक त्यांच्या स्वागतासाठी जमले होते.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यावर चर्चा करणे हा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा मुख्य केंद्रबिंदू आहे. दोन्ही देशांदरम्यान मध्यस्थी करण्यासाठी भारत संभाव्यत: रचनात्मक भूमिका बजावत आहे.
दिल्लीत, पोलंड आणि युक्रेनला रवाना होताना पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘द्विपक्षीय सहकार्य मजबूत करण्यासाठी आणि युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणावर विचार सामायिक करण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी पूर्वीची चर्चा पुढे नेण्याच्या संधीची वाट पाहत आहे. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की कीवमध्ये पंतप्रधान व्यापार, आर्थिक गुंतवणूक, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि मानवतावादी मदत यासह द्विपक्षीय संबंधांवर चर्चा करतील.