Shikhar Dhawan announced Retirement : भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना शनिवारी सकाळी मोठा धक्का बसला आहे, कारण टीम इंडियातील स्टार फलंदाज शिखर धवनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धवन बराच काळ संघाबाहेर होता आणि त्याच्या पुनरागमनाच्या सर्व आशा मावळल्या होत्या. तो शेवटचा डिसेंबर २०२२ मध्ये भारतीय संघाच्या जर्सीत दिसला होता. सोशल मीडियावर एक खास व्हिडिओ जारी करून धवनने निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्ती जाहीर करताना तो भावूकही झाला.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये धवन म्हणाला, ‘आज मी अशा टप्प्यावर उभा आहे, जिथून मागे वळून पाहताना फक्त आठवणी दिसतात आणि पुढे पाहताना संपूर्ण जग दिसते. टीम इंडियासाठी खळणे हे माझे स्वप्न होते आणि ते पूर्णही झाले. ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. सर्वप्रथम, माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा जी, मदन शर्मा जी ज्यांच्या हाताखाली मी क्रिकेट शिकलो. आणि माझी टीम ज्यांच्यासोबत मी वर्षानुवर्षे खेळलो.
शिखर पुढे म्हणाला, पुढे जाण्यासाठी पान उलटावे लागते. मी पण तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. जेव्हा मी माझ्या क्रिकेट प्रवासाला निरोप देत आहे, तेव्हा माझ्या मनाला एक शांती आहे की मी माझ्या देशासाठी खूप खेळलो आणि मी BCCI आणि DDCA यांचा खूप आभारी आहे ज्यांनी मला संधी दिली आणि माझ्या सर्व चाहत्यांचा ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. मी पुन्हा या देशासाठी खेळणार नाही याचं दु:ख आहे. पण माझा प्रवास नेहमीच माझ्यासोबत राहील आणि मला आनंदात ठेवेल.”
https://x.com/i/status/1827164438673096764
धवनने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्या क्रिकेट प्रवासाचा हा अध्याय मी बंद करत आहे. मी माझ्यासोबत असंख्य आठवणी आणि कृतज्ञता घेऊन जातो. प्रेम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. जय हिंद….”
शिखर धवनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
डावखुरा फलंदाज शिखर धवनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 34 कसोटी, 167 एकदिवसीय आणि 68 टी-20 सामने खेळले आहेत. या काळात त्याने कसोटीत 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात ‘गब्बर’ने 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या. त्याच्या नावावर T20 मध्ये 1759 धावा आहेत. धवनने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 24 शतके आणि 55 अर्धशतके झळकावली आहेत.