Sharad Pawar : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज महाविकास आघाडी मधील मोठे नेते रस्त्यावर उतरले आहेत.
यावेळी राष्ट्रवादी-सपा अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यातील आंदोलनात भाग घेतला. शिवसेना-यूबीटी आणि काँग्रेस पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही त्यांच्यासोबत दिसले.
या आंदोलनात शरद पवार यांनी तोंडाला काळे मास्क आणि हातात काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. त्यांच्यासोबत अनेकांनी मनगटावर, काहींनी हातावर तर काहींनी डोक्यावर काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला.
गेल्या आठवड्यात बदलापूर येथे घडलेल्या घटनेने पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, जागोजाग आंदोलनं केली जात आहेत, या प्रकरणी पीडितांचे पालक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना 12 तास असेच उभे केल्याचा आरोप होत आहे. जेव्हा लोकं रस्त्यावर उतरली तेव्हा एफआयआर नोंदवून आरोपीला अटक करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या या निष्काळजीपणच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील अनेक नेते रस्त्यावर उतरून सरकारवर टीका करत आहेत.
https://twitter.com/i/status/1827208698969645379
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून विशेषत: बदलापूरमध्ये निदर्शने झाली. संतप्त लोकांनी शाळेबाहेर निदर्शने तर केलीच पण शाळेच्या आतही घुसून तोडफोड केली. संतप्त शहरवासीयांनी रेल रोको पुकारला आणि हजारो लोक रेल्वे रुळांवर संपावर बसले. दुसरीकडे, महाराष्ट्र सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र, या प्रकरणाने आता राजकीय रंग घेतला आहे. शाळेतील अधिकाऱ्यांचे भाजपशी संबंध आहेत, त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यूबीटीने केला आहे, तर राष्ट्रवादी-सपा नेत्या सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचवेळी, आज एमव्हीएमचे नेते राज्याच्या विविध भागात काळे झेंडे फडकावून आणि काळ्या पट्ट्या लावून निषेध करत आहेत.