देशात एका पाठोपाठ एक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला. चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकाराच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी मोर्चे आणि आंदोलने काढण्यात आली आहेत. याच पा घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु ही महाराष्ट्र बंदची हाक बेकायदेशीर असून कायदेशीर कारवाई सुरू करा असे मुंबई उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
यानंतर महाराष्ट्र बंदची हाक मागे घेण्यात आली असून आता ठिकठिकाणी मोर्चे आणि आंदोलने काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे आंदोलन शांततापूर्वक होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पुण्यात मुक आंदोलन होणार असून हे आंदोलन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील या आंदोलनात उपस्थित असणार आहेत.
मुंबईतील शिवसेना भवनाजवळ ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज आंदोलन करणार आहेत. काळा झेंडा आणि काळी पट्टी बांधून काँग्रेसकडून ठीक ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले आहे. या आंदोलनाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत कारण महाविकास आघाडीतील नेते पहिल्यांदाच संयुक्त पद्धतीने आंदोलन करत आहेत. दरम्यान, महाविकास आघाडीचे सर्वच नेते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.