Sharad Pawar : बदलापूरमधील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानवी अत्याचाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात या मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे जनतेमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या निषेधार्थ आज महाविकास आघाडी मधील मोठे नेते रस्त्यावर उतरले आहेत.
आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केले. आंदोलनादरम्यान मुसळधार पाऊस सुरू झाला. यानंतरही हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले.
महाविकास आघाडीचे बहुतांश नेते हे तब्बल एक तास पावसात बसून या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. यावेळी शरद पवार देखील पावसात बसलेले दिसून आले. या आंदोलनात संबोधित करताना शरद पवारांनी भर पावसात सरकारवर टीका केली तसेच या सरकराची कीव येते असे म्हंटले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या आंदोलनाला राजकीय म्हणणे, म्हणजे यातून सरकारचा बदलापूर घटनेविषयी असंवेदनशीलपणा समोर येतो. या सरकारची कीव येते”, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, देशात एका पाठोपाठ एक स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनांच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने देखील करण्यात आली. महाराष्ट्रातील बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. याघटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच यावरून राजकीय वातावरण देखील पेटले आहे.
बदलापूर येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने 24 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने (Court) परवानगी नाकारल्याने महाराष्ट्र बंद मागे घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत एक तासाचे मुक आंदोलन पुण्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे करण्यात आले.